जय गणेश मंदिर, मालवण

कालनिर्णयकर्ते ज्योतिभास्कर जयंतराव साळंगावकर हे मूळचे मालवणचे. त्यांनी आपल्या राहत्या घराच्या जागी लाखो रुपये खर्चून सर्वांगसुंदर असे गणेश मंदिर उभारले आहे. शास्त्रोक्त पद्घतीने बांधलेले हे मंदिर पाहताचक्षणीच मन प्रसन्न होते. उत्तम शिल्पकला आणि भडक ऑइलपेंट टाळून केलेली सुखद रंगसंगती आणि कमालीची स्वच्छता असून श्री साळगांवकरांनी आपल्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे मंदिर बांधले आहे. गाभार्‍यामधली सुवर्णगणेश मूर्ती अतिशय चित्ताकर्षक आहे. मंद तेवणार्‍या नंददीपांच्या प्रकाशात सुवर्ण चौरंगावर विराजमान झालेले श्री गजानन, दोन्ही बाजूस ऋध्दी-सिध्दी आणि चवर्‍या ढाळणारे मूषक डोळे भरुन पाहताना ’दर्शनमात्रे मनः कामनापूर्ती’ असा अनुभव येतो. आदिदेवता श्री गणेशाच्या भक्तांना त्याच्या कृपेने सर्व क्षेत्रात जय मिळावा म्हणून या मंदिराचे नाव ’जय गणेश’ मंदिर ठेवण्यात आले आहे.
सभामंडपाच्या घुमटावर आतल्या बाजूने गणपतीच्या आठ मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपामध्ये उभे राहिल्यानंतर आठ दिशांना असलेल्या आठही मूर्ती आपल्याभोवती आहेत अशी, दृढ भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि तेथे उभे राहिल्यानंतर समोर दिसणारा हा सुवर्ण गणेश सिध्दी बुध्दीसहीत आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने पाहतो आहे याची मनोमन खात्री पटते.
मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. या जागी उभे राहून श्रध्देने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.
मकर संक्रांतीच्यावेळी सूर्याची कोवळी किरणे थेट मूर्तीवर पडतात त्यावेळी सोन्याचा गणपती विलक्षण तेजाने झळाळून निघतो यावेळी विशेष गर्दी असते.

No comments:

Post a Comment