साई मंदिर, कविलगांव (कुडाळ)


शिर्डी तीर्थक्षेत्र म्हणजे साईभक्तांसाठी ब्रम्हनगरी आणि सिंधुदुर्गातील शिर्डी म्हणजे कविलगांवची साई नगरी. कुडाळ रेल्वे स्थानकापासून अर्ध्या कि.मी. व बस स्थानकापासून ४ कि.मी. वर साईबाबांचे मंदिर असून हे मंदिर भारतातील पहिले साई मंदिर म्हणून ख्याती मिळवून आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की कविलगांव येथे रामचंद्र रावजी उर्फ दादा मांड्ये हे श्री दत्त महाराजांचे असिम भक्त व त्यांच्या कठोर भक्तीचे फलस्वरुप त्यांना एके दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष दत्त महाराजांनी साक्षात्कार घडवून तू शिर्डीला ये असे सांगितले. त्याप्रमाणे शिर्डी येथे गेलेल्या मांड्ये यांना साईबाबांची भेट घडली व तेव्हाच त्यांना साई स्वरुपात दत्ताचे प्रत्यक्ष दर्शन घडले. काही वर्षात म्हणजे सन १९१८ साली शिर्डी येथे बाबांनी आपला पवित्र देह ठेवला आणि त्यानंतर लगेच दुसर्‍या वर्षी म्हणजे सन १९१९ साली कविलगांव या गावात बाबांच्या अद‍भूत भक्तीप्रेरणेने प्रेरीत झालेल्या मांड्ये यांनी बाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव साजरा केला. तेव्हापासून बाबांच्या पुण्यतिथी उत्सवास कविलगांवात सुरुवात झाली.
आज आपण कविलगांवचे भव्य साईमंदिर पाहतो ते त्या काळी एक लहानशी गवताची झोपडी होती. या मंदिरातील साईची प्रमुख मूर्ती ६ फूट उंचीची आहे. त्याप्रमाणे या मंदिरात अनेक साधूसंतांच्या देवदेवतांच्या दत्त महाराजांच्या मूर्त्या आहेत. शिवाय वेगळे असे दत्त मंदिरही आहे. साईंच्या प्रमुख मूर्तीतून खर्‍याभक्ताला नेहमी सोज्वळ किरणे बाहेर पडताना दिसतात. मूर्तीची चैतन्यता भक्तांस मंदिरात खिळवून ठेवणारी आहे. बाबांच्या भक्त वात्सल्य नेत्रांकडे पाहताना नास्तिकालाही भक्तीचे वेड लागल्यावाचून राहत नाही. असे हे साई मंदिर कविल गावासाठी शिरोभूषण आहे. म्हणूनच कविलगांव हे कोकणची शिर्डी समजली जाते.
साईबाबा मंदिराच्या बाजूलाच रामचंद्र उर्फ दादा मांड्ये यांची घुमटी मध्ये आसनस्थ मूर्ती आहे.

No comments:

Post a Comment